*मृदुगंध*
आषाढातील दुपार..
श्यामल मेघ..
प्राण नयनात आणलेल्या त्या चातकाची तीष्ठ्ताही ओसरू पाहतेय..
सर्वच कसं अगतिक..
तुषार शिंपीत..
थुई थुई नाचत..
नाजूकपणे रिमझिम बरसत..
सृष्टीला शचैल भिजवत..
वसुंधरा अन अंबर ह्यांच्या मिलनाचा तो दूत..
अवघ्या चराचराला नवलाई आणतो..
ऊर भरून घ्यावा असा सुगंध उधळतो..
कस्तुरी,अत्तर,सुमने सर्वच थिटे त्या सामोरी..
असा हा परिमल त्या उत्कट क्षणातच जाणवतो..
पण,
शाश्वततेने मनाच्या गाभार्यात दरवळत
राहतो..
हा भावरूपी मृदुगंध..